गेल्या काही महिन्यांत देशभरात, विशेषतः महाराष्ट्रात, घडलेल्या काही घटनांनी समाजाच्या मूल्यव्यवस्थेला जबरदस्त हादरा दिला आहे. लग्नानंतर अवघ्या १७ दिवसांत नवऱ्याचा खून करणारी पत्नी, विवाहबाह्य प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा जीव घेणाऱ्या पत्नी, आणि एकीकडे प्रेमाच्या नाट्यावर उभारलेली कुटुंबव्यवस्था—या सर्व घटनांनी एक चिंताजनक वास्तव अधोरेखित केलं आहे: आपण कुठे जात आहोत?
संयुक्त कुटुंबपद्धतीपासून एकल जीवनशैलीकडे होत चाललेल्या झपाट्याने संक्रमणामुळे भावनिक नात्यांमधील घट्टपणा सैलावतो आहे. डिजिटल युगातील कृत्रिमतेच्या आहारी गेलेल्या पिढीला “नात्यांचे बंध” हे आता एक “बाधा” वाटू लागले आहेत. लग्न म्हणजे दोन मनांची नितांत समर्पणशील सोबत नव्हे, तर “स्टेटस सिंबॉल” बनू लागले आहे. परिणामी, नात्यातील विसंवादांवर चर्चा करण्याऐवजी हिंसक मार्ग स्वीकारण्याच्या घटना वाढल्या आहेत.
सांगली येथील घटना असो की हनीमूनदरम्यान नवऱ्याचा खून — या घटना केवळ गुन्हेगारी बाबी नाहीत, तर समाजातील नैतिक मूल्यांच्या क्षयाचे लक्षण आहेत. न्यायालयांनी अशा घटनांमध्ये कठोर दृष्टीकोन स्वीकारत गुन्हेगारांवर शिक्षा केल्या असल्या तरी मूळ कारणांवर उपचार न झाल्यास ही चक्रवाढ थांबणे अशक्य आहे.
विशेषतः अनैतिक संबंध, झपाट्याने विकसित होणारे प्रेमसंबंध, आणि “गिल्ट-फ्री” स्वार्थसिद्धीचा कल — या सर्वांनी मानवी विवेक, करुणा आणि सहिष्णुता यांना गृहित धरले आहे.
मानसोपचार तज्ज्ञ स्पष्टपणे सांगतात की, सध्याचा सामाजिक ताण, स्पर्धात्मकता आणि डिजिटल मीडियातील कृत्रिम ‘परफेक्ट लाइफ’ चे आकर्षण हे मानसिक अस्थैर्याचे मूळ आहेत. स्व-प्रतिमेच्या रक्षणासाठी किंवा सामाजिक प्रतिष्ठेच्या दबावामुळे अनेक लोक नैतिकता, प्रेम व जबाबदारी या संकल्पनांकडे पाठ फिरवत आहेत.
नैतिकतेचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि समाजात स्थैर्य निर्माण करण्यासाठी समाज, कुटुंब आणि शासन यांची एकत्रित जबाबदारी अनिवार्य आहे. कुटुंब ही समाजघटकाची प्राथमिक शाळा असून, तिथेच मूल्यमूलक संवाद, सहिष्णुता, आणि परस्पर आदर शिकवले जातात. पालकांनी मुलांशी खुले संवाद साधून त्यांना नैतिकतेचे बीज पेरावे लागते.
याशिवाय, शालेय शिक्षणात केवळ परीक्षाभिमुख ज्ञान न देता, नैतिक शिक्षणाची ठोस अंमलबजावणी व्हायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारी, करुणा आणि इतरांच्या भावनांची जाण निर्माण व्हावी, हा शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे.
माध्यमांची भूमिका देखील या साखळीत फार महत्त्वाची आहे. सनसनाटी मथळ्यांमुळे समाजात अस्थैर्य आणि अतिरेकी भावना वाढतात. त्यामुळे माध्यमांनी सामाजिक सजगतेला, विवेकशीलतेला आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शासनाने विवाहपूर्व समुपदेशन केंद्रे, कौटुंबिक सल्लागार केंद्रे, तसेच मानसिक आरोग्यासाठी खास यंत्रणा स्थापन कराव्यात.
आज वाढत्या मानसिक अस्थैर्यामुळे अनेक गंभीर घटना घडत असल्यामुळे यावर तातडीने आणि गंभीरतेने उपाययोजना करणं गरजेचं आहे. शासन, समाज आणि कुटुंब यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच आपल्याला भावी पिढीला एक सुसंस्कृत, समंजस आणि नैतिकदृष्ट्या बळकट समाज देणं शक्य होईल.
राधे-कृष्णाचं प्रेम, राम-सीतेचं समर्पण हे केवळ पुराणातील दंतकथा राहाव्यात का? की आपल्याला त्यातील ‘नैतिक बीज’ जपण्याची जबाबदारी घ्यावी लागेल?
आज समाजात नैतिकतेचे जे लोप पावणारे लक्षण दिसत आहेत, ते उद्याच्या पिढीच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरतील. त्यामुळेच नात्यांमध्ये संवाद, सन्मान आणि सहिष्णुता हाच खराखुरा ‘न्याय’ ठरेल.