Views: 3

‎• छावा • मुंबई, दि १३ जून • प्रतिनिधी

राज्यातील नद्यांच्या किनाऱ्यालगत अनेक ठिकाणी दीर्घकाळ पूरस्थिती उद्भवलेली नसतानाही, सध्याची पूर नियंत्रण रेषा विकासाला अडथळा ठरत असल्याने ती नव्याने ठरवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करून मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा सह्याद्री अतिथीगृहात घेतला गेला. या बैठकीला स्थानिक आमदार किसन कथोरे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी उल्हास नदीकाठच्या नकाशातील पूर रेषा आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांचा तुलनात्मक आढावा घेतला. त्यांनी जलसंपदा विभागाला नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. बदलापूर रेल्वे स्थानक परिसर, ओव्हरब्रिज आणि मेट्रोसारख्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बदलापूरसाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र, पोलीस स्टेशनसाठी जागा, तसेच अनधिकृत शाळा महापालिकेकडे हस्तांतर यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Loading