Views: 7

• सोशल मीडियावरील दाव्यांमागील सत्य काय?

• छावा • अलिबाग, दि. १२ जून  • विशेष प्रतिनिधी

अलीकडेच सोशल मीडियावर एक संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात असा दावा केला जात आहे की, भारत सरकार लवकरच पारंपरिक पिन कोड प्रणाली बंद करून ‘DIGIPIN’ नावाची नवीन प्रणाली सुरू करणार आहे. मात्र, ह्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. डिजीपिन ही पिन कोडची जागा घेणारी प्रणाली नसून एक पूरक तंत्रज्ञान आहे, जे पत्ते अचूक करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे.

भारतीय डाक विभाग (India Post) व भारतीय सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमातील अधिकृत प्रतिनिधींनी स्पष्टपणे सांगितले आहे की, DIGIPIN ही प्रणाली पारंपरिक पिन कोडचा पर्याय नसून त्याचा पूरक उपाय आहे. पत्त्यांचे डिजिटायझेशन, अचूक मार्गदर्शन, आणि डिलिव्हरी सुलभतेसाठी DIGIPIN उपयुक्त ठरेल. मात्र, पारंपरिक पिन कोड कायम ठेवले जाणार आहेत.

DIGIPIN म्हणजे काय आणि त्याचा उपयोग…?

DIGIPIN (Digital PIN) ही 4 मीटर x 4 मीटर क्षेत्रफळ असलेल्या विशिष्ट ठिकाणासाठी वापरण्यात येणारी भौगोलिक-कोडेड डिजिटल पत्ता प्रणाली आहे. हे तंत्रज्ञान Google च्या “Plus Codes” किंवा “What3Words” सारख्या आधुनिक प्रणालींवर आधारित आहे. प्रत्येक DIGIPIN एक विशिष्ट स्थळाचे अचूक स्थान दर्शवतो.

व्हायरल पोस्टचा दावा खोटा 

DIGIPIN अजून प्रायोगिक स्वरूपात आहे. काही खास प्रकल्पांमध्ये याचा वापर सुरू आहे. कुठल्याही अधिकृत अधिसूचनेत पिन कोड रद्द करण्याचा उल्लेख नाही. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये कोणताही अधिकृत स्रोत दिलेला नाही.

DIGIPIN ही पत्ता व्यवस्थापनासाठी एक अभिनव आणि डिजिटल प्रणाली आहे, मात्र ती भारतातील पारंपरिक पिन कोड प्रणालीची जागा घेणार नाही.