Views: 4

संरक्षण व कल्याण मंडळाला दिले सक्रिय रूप

• छावा • मुंबई, दि. १२ जून • वृत्तसंस्था 

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक असून, या समुदायाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी “महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ” स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या सदस्यांना बैठका आणि प्रवासासाठी मानधन देण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.

या मंडळाची पहिली अधिकृत बैठक मंत्रालयात मंत्री श्री. शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वेळी आमदार बालाजी किणीकर, आनंद बोंढारकर, अमोल मिटकरी, विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, तसेच मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. सान्वी जेठवानी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

तृतीयपंथीय समुदायाच्या कामासाठी स्वतंत्र कार्यालय आवश्यक असल्याचे सांगून, मुंबईमध्ये यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही मंत्री शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केले.

तृतीयपंथीय समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये गती येण्यासाठी हे मंडळ मार्गदर्शक आणि समन्वयकाची भूमिका बजावणार आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात समावेश करण्याच्या दृष्टीने ही बैठक आणि पुढील योजना अत्यंत महत्वाच्या ठरणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.