Views: 6

• मनसे–ठाकरे गटाची समीकरणे बदलण्याच्या वाटेवर?

• छावा • मुंबई, दि. २३ जून • विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे हे चित्र रंगत चालले आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या शक्यतेने कार्यकर्त्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते, तर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या सातत्यपूर्ण आक्रमक भूमिकेमुळे ही शक्यता पुन्हा अनिश्चिततेच्या छायेखाली गेली आहे.

 “तुम्ही जुने असून काय उप****?” — देशपांडेंची पोस्ट

एक्स (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर संदीप देशपांडेंनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी ठाम शब्दात म्हटले:

“होय, आम्ही नवीन आहोत. पण कधी ‘केम छो वरळी’ म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत. मुस्लिम मतांसाठी २० हजार केसेस भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाहीत. तुम्ही जुने असून काय उपटलं?”

ही पोस्ट ठाकरे गटावर स्पष्टपणे टीका करणारी होती. विशेषतः संजय राऊत यांना ‘ताटातल्या चमच्यांप्रमाणे वागू नका’ असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी काही दिवसांपूर्वीच लगावला होता.

 राऊत यांचे प्रत्युत्तर: संयमाचा सल्ला

शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्ते संजय राऊत यांनी यावर प्रत्युत्तर देताना म्हटले:

 “राजकारणात संयम महत्त्वाचा असतो. उथळपणा करून राजकारण चालत नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आला की प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे.”

काही दिवसांपूर्वी सांगलीत मनसे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊन राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करताना दिसले होते. उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना स्थापना दिवसाच्या भाषणात ‘मराठी मतांचे विभाजन थांबवणे गरजेचे’ असे वक्तव्य करून युतीच्या शक्यतेचे संकेत दिले होते. परंतु संदीप देशपांडेंच्या सातत्यपूर्ण टिकांमुळे या चर्चांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

राज–उद्धव युतीच्या चर्चांना सुरुवातीला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. मात्र, मनसेतील काही नेत्यांच्या आक्रमक शैलीमुळे हे प्रयत्न अडथळ्यांत सापडले आहेत. मराठी मतांचे एकत्रीकरण हे दोन्ही पक्षांचे प्रमुख उद्दिष्ट असावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असली तरी नेतृत्वातील विरोधाभास युतीच्या शक्यतेला मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.