Views: 6

• राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

• जिल्हा प्रशासनाला अलर्ट मोडवर काम करण्याचा आदेश

• छावा, दिनांक २६ जून • अलिबाग, विशेष प्रतिनिधी

“राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्या तरी जनतेपर्यंत त्या तातडीने पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी ‘अलर्ट मोड’वर कार्य करावे,” असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, माजी आमदार पंडित पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पाणीपुरवठा योजनांचे नियोजन, अंमलबजावणी, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचे निराकरण आणि जलजीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या योजनांवरील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. या विषयांवर लवकरच मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात येईल, अशी घोषणाही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी केली.

तसेच, सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबवावी, आरोग्य सेवा १०० टक्के लाभदायक व्हावी यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी केल्या. वीज वितरणासंदर्भातील तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यावर भर देत अखंडित वीज पुरवठा राखण्यासाठी दक्षता बाळगण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

भूमिगत वायरिंग पूर्ण झाल्यानंतर ओव्हरहेड वायरिंग तात्काळ हटवावी, वारंवार बिघडणाऱ्या ट्रान्सफॉर्मर्स संदर्भात कारणमीमांसा करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. सेवा सप्ताह अंतर्गत ओळखलेल्या धोकादायक भागांमध्ये तातडीने सुधारणा करणं आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

“प्रत्येक विभागाने जनतेच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन, तत्काळ कार्यवाही केली पाहिजे. यामध्ये कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नाही,” असा ठाम इशाराही त्यांनी यावेळी दिला.

या बैठकीच्या प्रारंभी संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आपल्या योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी, “जिल्हा प्रशासन विकासासाठी सजग असून सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे,” अशी माहिती दिली.

Loading