“आता नकली आखाडा सोडून खऱ्या आखाड्यात उतरलो आहोत,” असे ठाम वक्तव्य करत डबल महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान चंद्रहार पाटील यांनी आज शेकडो समर्थकांसह शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. सांगली जिल्ह्यातील उबाठा गटाचे पदाधिकारी असलेले चंद्रहार पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत एकप्रकारे नव्या राजकीय पर्वाची सुरुवात केली.
या प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सुहास बाबर, शिवसेना सचिव राम रेपाळे, संजय मोरे, प्रवक्ते राहुल लोंढे, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, अभिनेत्री दिपाली सय्यद तसेच अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “माझ्यावर गेल्या तीन वर्षांपासून आरोप होत असले तरी मी आरोपांना कामातून उत्तर दिले. त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या कामांना ऐतिहासिक प्रतिसाद दिला आणि महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या. ही शिवसेना वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, टोमणेसम्राटांची नाही,” असा रोखठोक संदेश देण्यात आला.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, “पैलवान हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. मी जरी पैलवान नसलो तरी २०२२ मध्ये राजकीय आखाड्यात अनेकांना चारीमुंड्या चीत केलं. पैलवानांना डावपेच ठाऊक असतात आणि आज तेच डावपेच शिवसेना बळकट करण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत.”
चंद्रहार पाटील यांनी केवळ कुस्ती क्षेत्रातच नव्हे तर देशभक्तीचेही उदाहरण ठेवले आहे. सीमेवरील जवानांसाठी दिल्लीत रक्तदान शिबीर घेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला. या भूमिकेचे सर्वपक्षीय स्तरावर कौतुक होत आहे.
चंद्रहार पाटील यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील पहिला हिंद केसरी संतोष आबा वेताळ, पैलवान विकास पाटील, सायगावचे उरसरपंच सागर वंजारी, सुरलीचे उपसरपंच कृष्णात भादणे, अमोल घोगे, सुशांत जाधव, संजय कांबळे, लक्ष्मण मंडळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे शिवसेनेला सांगली, सातारा आणि कोल्हापूर परिसरात नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. कुस्ती विश्वातला मानाचा तुरा आणि शेतकरी समाजाशी नाळ जुळवलेले नेतृत्व शिवसेनेच्या गढात नवा बळ घेऊन आले आहे.