Views: 3

संजय राऊतांची राजकीय सॉफ्ट डिप्लोमसी

राज-उद्धव युतीचा संभाव्य सूर

मुंबई (वृत्तसंस्था, दि.०६ जून) “मातोश्रीनंतर कृष्णकुंज म्हणजे राज ठाकरे यांचे घर हे आमचं दुसरं घर आहे”, असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्रात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील संभाव्य युतीच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. याच दरम्यान शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिलेलं हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे.

संजय राऊत म्हणाले, “दोघे चुलत भाऊ आहेत आणि नातं व्यक्तिगत पातळीवर आजही जिव्हाळ्याचं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्येही सकारात्मक संवाद सुरू आहे. जेव्हा दोन कुटुंबं जवळ येतात, तेव्हा त्यासाठी कोणत्याही औपचारिकतेची गरज नसते.”

मनसे-शिवसेना युती शक्यतेकडे वाटचाल?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंधांची चर्चा नवीन नाही. मात्र, सध्या शिवसेना (UBT) आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतंत्र रणनिती आखली जात आहे. तरी, संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय निरीक्षक याला “युतीसाठी खुला दरवाजा” मानत आहेत.

संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीला पुन्हा चालना मिळाल्याचं दिसत आहे. “दुसरं घर” ही संज्ञा फक्त नात्यांपुरती मर्यादित नाही, तर ती भविष्यातील राजकीय एकत्र येण्याचाही संकेत ठरू शकते. सध्या दोन्ही पक्षांमध्ये औपचारिक चर्चा न झाल्याचं जरी सांगितलं जात असलं, तरीही संपर्क कायम असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.