कल्याण-डोंबिवली | छावा; ७ जून, प्रतिनिधी | कल्याण-डोंबिवली परिसरात मागील काही दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असताना आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी सुरू झालेला जोरदार पाऊस काही वेळासाठी थांबला असला, तरी दुपारी पुन्हा एकदा तासाभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला असला, तरी शहरातील काही भागांमध्ये जलतरण परिस्थिती निर्माण झाली आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील एच वॉर्ड शेजारील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले असून, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र तरीही केडीएमसी प्रशासनाकडून या समस्येवर अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
केडीएमसीकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा गाजावाजा केला जातो. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. केवळ तासाभराच्या पावसानेच अनेक ठिकाणी नाल्यांमधून पाणी ओसंडून रस्त्यावर आल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. यावरून केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल झाल्याचे स्पष्ट होत आहे.
संग्रहित
“दरवर्षी याच रस्त्यावर पाणी साचते. आम्ही वारंवार तक्रारी करतो, तरीही काहीच कारवाई होत नाही. रस्त्यावरून जाणंही अवघड झालंय,” असे स्थानिक रहिवासी मनोज पाटील यांनी सांगितले.
हवामान विभागाने पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत नागरी संस्थांकडून व्यक्त केले जात आहे.