Views: 4

वंदे भारत आता जम्मू-काश्मीरमध्ये

चिनाबखोऱ्यात ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण

नवी दिल्ली | छावा, दि.०७ ; वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरला रेल्वेमार्गाने भारताच्या मुख्य भूप्रदेशाशी जोडण्याचे अनेक दशकांचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कटरा ते श्रीनगरदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवेचे भव्य उद्घाटन करण्यात आले. ही सेवेची सुरूवात जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील पहिली थेट रेल्वे संपर्क सेवा आहे, ज्यामुळे देशाच्या उत्तर टोकातील नागरिकांना ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असा प्रवासाचा नवा अध्याय उघडला आहे.

या ऐतिहासिक प्रसंगी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, “पंतप्रधान मोदी यांच्या दृढ संकल्पामुळे आणि दूरदृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्गाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले. उंच पर्वतरांगा, खोल दऱ्या आणि निसर्गाच्या आव्हानांवर मात करत ही कामगिरी शक्य झाली आहे.”

‘टी-50’ – देशातील सर्वात लांब बोगद्याचा थरारक अनुभव

वंदे भारत ट्रेनचा प्रवास ‘टी-50’ या देशातील सर्वात लांब रेल्वे बोगद्यामधून झाला. हा बोगदा खारी ते सुंबरदरम्यान असून त्याची लांबी तब्बल १२.७७ किलोमीटर आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी स्वतः या बोगद्यातून प्रवास करत अनुभव घेतला आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत भावनिक प्रतिक्रिया दिली. “ही केवळ रेल्वे सेवा नाही, तर देशाच्या एकात्मतेचा बळकट दुवा आहे,” असे त्यांनी म्हटले.

हिमालयात अभियांत्रिकीचा चमत्कार

२०१४ नंतर सुरू झालेल्या या प्रकल्पात कटरा ते बनिहाल या १११ किमीच्या मार्गात ९७ किमी अंतर बोगद्यांमधून आणि उर्वरित ७ किमी अंतर पुलांवरून पार केले जाईल. यासाठी अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि विशेष प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली होती.

चिनाब आणि अंजी पूल – ‘माँ भारती’च्या मुकुटातील रत्न

या मार्गावरील चिनाब नदीवरील पूल हा जगातील सर्वात उंच कमानीच्या पद्धतीचा रेल्वे पूल आहे, जो तब्बल ३५९ मीटर उंच आहे – एफिल टॉवरपेक्षाही अधिक. तसेच अंजी पूलसह एकूण १६ पूल आणि अनेक सुरंगे या प्रकल्पात समाविष्ट आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या दोन्ही पूलांचेही उद्घाटन केले.

जम्मू रेल्वे स्थानकाचा कायापालट

या रेल्वे सेवेसोबत जम्मू रेल्वे स्थानकावरही आधुनिक सुविधांचा विकास सुरू असून सप्टेंबरपर्यंत तीन नवे प्लॅटफॉर्म पूर्णत्वास येतील. सप्टेंबरपासून जम्मूमधून थेट श्रीनगरला वंदे भारत ट्रेन नियमित धावेल, असेही रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केले.

छायाचित्रे