अमरावती (वृत्तसंस्था, दि. ०६ जून) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अचलपूर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
मागासवर्गीय प्रवर्गनिहाय रिक्त असणाऱ्या आरक्षित जागांनुसार समाजातील अनु.जाती, अनु.जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग व अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशास पात्र आहेत. शालेय विभागातील इयत्ता ८ वी, कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी, बिगर व्यावसायिक महाविद्यालय व व्यावसायिक महाविद्यालयातील प्रथम वर्षातील प्रवेशासाठी विद्यार्थी अर्ज भरण्यास पात्र आहेत. प्रवेश अर्ज शासकीय वसतिगृहाच्या https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज भरता येईल.
या अनुषंगाने जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर करावे, जेणेकरून शासनाकडून मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येईल. संबंधितांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.